लातूर : प्रतिनिधी
येथील कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जिमखाना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद रेहमान, कृषि महाविद्यालय, जीरेवाडी व पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,जीरेवाडीचे अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. व्यंकट जगताप विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रीती चोपडे, डॉ. ऋतुजा स्वामी, विक्रांत हुलसुरे, एल. एस. गायकवाड, डॉ. ऋतुजा घोडखर, शुभम गिरी, सोहेल सय्यद, चेतन वाघमारे, वैष्णवी कांबळे, हे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ खरे जीवनदान आहे, विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रतीचे उत्तरदायित्व पार पाडावे असे विचार अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी रक्तदानाचे महत्व विषद करताना अध्यक्षीय समारोपात मांडले.
प्रमुख अतिथी सय्यद रेहमान म्हणाले कि, रक्तदानाच्या एकूण गरजेपैकी केवळ ७५ टक्के रक्त उपलब्ध होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक रक्तदान करून पुण्य मिळवावे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. प्रीती चोपडे रक्तदानाचे महत्व सांगताना म्हणाल्या कि, रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नसल्यामुळे त्याची निर्मिती मर्यादित आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडावे. यावेळी एकूण ३७ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय भामरे, डॉ. विनोद शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, देविदास चामणीकर, संजयकुमार कांबळे, दीपक जाधव, उत्तम पवार यांचे सहकार्य लाभले.