लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याभरात दि. १३ मार्च रोजी होळी साजरी करण्यात आली. होळी पोर्णिमेनंतर पाच दिवसांनी येणा-या पंचमीला रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा लातूर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत आहे. यंदाची रंगपंचमी दि. १९ मार्च रोजी अत्यंत उत्साहात परंतु सामाजिक, पर्यावरणाच भान राखत कोरड्या नैसर्गिक रंगाची उधळण करीत मोठ्या उत्साहात साजरा केली. रासायनिकपेक्षा नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली. या उत्साहात तरुणांचा मोठा सहभाग होता. अबालवृद्धही रंगात नाहून लिघाले.
रंगपंचमीनिमित्त बुधवारी सकाळपासूनच लहानांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांची रंगांची उधळण सुरु केली होती. पाणीटंचाई नसली तरी सामाजिक भान म्हणून यंदा पाण्याची नासाडी खूप कमी प्रमाणात दिसून आली. शहरातील अपार्टमेंटची पार्किंग, घरासमोर अंगण, मोकळ्या जागेत रंग खेळण्यात आले. लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणा-या युवक-युवतींसह अवघी लातूर नगरी बुधवारी रंगात न्हाले असल्याचे दिसून आले.
रंगपंचमीच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांनाही वेगळाच रंग चढला. होळीनंतर येणा-या रंगपंचमीची मजाही वेगळीच असते. लहान मुलासह तरुनवर्ग तर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. गरीब असो या श्रीमंत तसेच लहान मोठा असा भेद भाव विसरायला लावणा-या आणि मनामनातील कटुता आपल्या रंगांनी पुसून टाकणा-या या दिवसाला सुरुवातच झाली बच्चेकंपनीच्या किलबिलाटाने. सकाळी उठल्या-उठल्या हातात वेगवेगळे रंग घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरून मित्र-मैत्रिणींना चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती-जमती मोठ्यांनाही हसायला लावणा-या दिसून येत होत्या. त्यांच्यासोबत रंग खेळताना मोठेही लहान झाले आणि मुलांचाही उत्साह दुगणा होत गेला.
सकाळी शालेय आणि महाविद्यालयीन मुला मुलींनीही रंग खेळायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर रंगलेल्या चेह-यांनी नातेवाईक आणि मित्र परिवाराला रंगवण्यासाठी मुलं महिलांसोबत दुचाकीवरून जात होते. याशिवाय शहरातील विविध तरुण मंडळांनीही रंगपंचमीचे आयोजन केले होते. शहरातील विविध भागातील गल्ली तसेच कॉलन्यांमध्ये रंगांची धूम सुरु असताना शहरातील चौका-चौकांत रस्त्याच्या कडेलाही अनेक पुरुष युवक रंग खेळताना दिसत होते. त्यामुळे दिवसभर नजर जाईल तेथे फक्त आणि फक्त्त रंगोत्सव साजरा होत असताना दिसत होता.
गल्लीत रंग खेळून झाल्यानंतर तरुणांनी बाईकवर शहरात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत शहरातील प्रत्येक चौका रंगात न्हालेल्या तरुणांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी साऊंड सिस्टीम लावून विविध गाण्यांवर तरुणांनी भन्नाट नृत्य केले. दरवर्षीच्या रंगपंचमीत रासायनिक रंगाचा मुक्त वापर होत असे. परंतू, यंदा नैसर्गीक आणि हर्बल रंगांचा सर्वाधिक वापर झाला. कोरडा रंग खेळण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पाण्याचा होणार अपव्यय झाला नाही. काही ठिकाणी विविध मंडळांनी रंगमंच उभारुन रंगपंचमी साजरी केली. या रंगमंचावरही तरुण-तरुणींचा उत्साह पहावयास मिळाला. यंदाच्या रंगपंचमीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे पर्यावरणपुरवक रंगपंचमी. यंदा तरुणांनी पर्यावरणपुरक रंगपंचमीवर भर दिलेला दिसून आला. तोंडाला रासायनिक रंग फासुन डोळ्यांना व त्वचेला दुखापत करुन घेत असलानाच हे रंग धुण्यासाठी पाण्याचाही मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. हे टाळण्यासाठी यंदा तरुणांनी नैसर्गीक, हर्बल रंग खेळून पर्यावरणपुरक रंगपंचमीवर भर दिलेला दिसून आला.