24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीच्या समुद्रात बुडून कुटुंबातील चौघांचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रात बुडून कुटुंबातील चौघांचा मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
आरेवारे येथे पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा शनिवारी समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यात तीन बहिणी आणि एकजण त्यांच्यापैकी एकीचा पती आहे. खवळलेल्या समुद्रात लाटांचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडाले. स्थानिक व्यावसायिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, तो निष्फळ ठरला.

उज्मा शामशुद्दीन शेख (१८), उमेरा शामशुद्दीन शेख (२९, दोघी रा. मुंब्रा, ठाणे), जैनब जुनैद काझी (२६), जुनैद बशीर काझी (३०, दोन्ही रा. ओसवालनगर, रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-मुंब्रा येथून उज्मा शेख, उमेरा शेख या दोघी रत्नागिरीतील त्यांची बहीण जैनब काझी हिच्याकडे आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या तिघी आणि जैनब काझी हिचा पती जुनैद बशीर काझी असे चौघेजण आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते. या चौघांना पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही. समुद्र खवळलेला असताना उसळलेल्या मोठ्या लाटेमुळे चौघेही पाण्यात ओढले गेले. या अपघातानंतर मुंब्रा परिसरात शोककळा पसरली होती.

जीव वाचविण्यासाठी आकांत
जीव वाचविण्यासाठी त्यांनी आकांत केला. काही वेळ एकमेकांना वाचवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला. ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे प्रयत्न असफल ठरले. पोलिसांनी सायं. ७ च्या सुमारास त्यांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित केले. या घटनेत मृत झालेल्या तीन बहिणींचे आई-वडील उंब्रा करण्यासाठी (पूजा करण्यासाठी) सौदी येथे गेले आहेत. यादरम्यान दोन बहिणी आपल्या रत्नागिरीतील बहिणीकडे आल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR