लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन दिनानिमित्त दि. ३० जानेवारी रोजी सहायक संचालक कार्यालय, लातूर कुष्टरोग विभाग व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त) यांच्या संयुक्तविदयमाने कुष्टरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याकारणाने प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते शहरातील महात्मा गांधी चौक येथील त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘रन फॉर लेप्रसी’ जनजागृती रॅली काढण्यात आली. डॉ. संजय ढगे (सहायक संचालक, वैद्यकीय, उपसंचालक कार्यालय, लातूर) यांचा हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. विद्या गुरुडे, सहायक संचालक हिवताप डॉ. सुमित्रा तांबळे, डॉ. अशोक सारडा, डॉ. संतोष हिंडोळे, डॉ. श्रीनिवास कदम, डॉ. सावंत, डॉ. आनंद कलमे, डॉ. सुनिता पाटील, डॉ. शिल्पा शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवाडयानिमित्त ‘कुष्ठरोगाबद्दल समाजामध्ये विविध उपक्रमांद्वारे एकजुटीने जनजागृती वृदधींगत करून त्याबाबतचा गैरसमज दूर करु व कुष्ठरोगाने बाधीत एकही व्यक्ती जनमाणसात शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेऊ’, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे व उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये कुष्ठरोग विषयक रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.