लातूर : प्रतिनिधी
रमजान महिन्याच्या निमित्ताने लातूर शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. या काळात अत्तर, डोळ्यात सुरमा लावण्यास मोठे महत्व असते. त्यामुळे शहरातील गंजगोलाईतील ७ ते ८ दुकानांमध्ये विविध प्रकारच्या अत्तराचा दरवळ आकर्षित करीत आहे. अत्तर, सुरमा, नमाजी टोपी, रुमालास सर्वाधिक मागणी आहे.
गंजगोलाई ही लातूर शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत सर्वच वस्तू मिळतात. तसे विविध प्रकारचे अत्तर, सुरमा, नमाजी टोपी, रुमाल, जानीमाज, कुरआन शरिफ, रिहाल, पारे, यासिन यासह विविध प्रकारची उर्दु पुस्तकेही उपलब्ध झाली आहेत. गेल्या ४०-४५ वर्षांपासून अत्तर, सुरमा या क्षेत्रात असलेले मिनार बुक डेपोवाले अर्थात अत्तरवाले म्हणून सुप्रसिद्ध असलेले रज्जाक अत्तरवाले व त्यांचे बंधु मंजूर अत्तरवाले यांनी हा व्यवसाय सांभाळला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यांच्याकडे मुंबई, गुजरात, मद्रास, चेन्नई आदी ठिकाणाहून आलेला कन्नोज, मीना, नियामत, मजमुआ, नाजमिन, पुष्पराज, पहाडी फुल, जन्नतुल फिरदोस आदी प्रकारचे अत्तर ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
रमजान महिन्यात डोळ्यात सुरमा लावण्यास विशेष महत्व आहे.मिनार बुक डेपोमध्ये खोजाती, डिलक्स सुरमा उपलब्ध आहे. ५०, ७० ते १०० रुपयांपर्यंत सुरमा विक्री केला जात आहे. नमाजी टोप्यांची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. अफगाणी, इन्डोनेशिया, सुदानी, फर कॅप, रामपुरी आदी प्रकारच्या टोप्यांना पसंती आहे. त्यात सर्वाधिक मागणी ही फर कॅपची आहे. रुमालमध्ये चायना, अरबी, गोंडा रुमाल उपलब्ध आहेत. १५० ते २५० रुपयांपर्यंत या रुमालच्या किंमती आहेत.
रमजाननिमित्त कपडे खरेदीसाठी मोठ्या प्रमणावर गर्दी होत आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्यासाठी विविध प्रकारचे डिझाईनचे कपडे उपलब्ध झाले आहेत. रमजना महिन्यात हमखास वापरला जाणारा अरबी कुंदरा, बुरखा इत्यादी कपड्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या व्यक्तींसाठी सलवार, झब्बा, पठाणी, अरबी, त्याचप्रमाणे जीन्सची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे लहानग्यांसाठी आकर्षक पेहरावही उपलब्ध आहेत.