सोलापूर : रमाई आवास योजनेसाठी शहरातील २४०० जणांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ ९८ अर्ज मंजूर झाले आहेत. यातून वंचित लाभार्थ्यांमध्ये रोष वाढला आहे. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करू, असे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. हा प्रकार महापालिका अधिका-यांमुळे घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केला. राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या वक्तव्यांची चर्चा आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी मनपाचे उपअभियंता अविनाश वाघमारे, प्रकाश दिवाणजी, किशोर सातपुते यांच्यासोबत बैठक घेतली. रमाई आवास योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिकेने राष्ट्रीय समुदाय संघटकांच्या माध्यमातून प्रक्रिया राबविली होती. केवळ ९८ अर्ज मंजूर झाल्यामुळे नागरिकांचा रोष वाढणे साहजिक आहे. या आवास योजनेसाठी लाभार्थ्यांकडे किमान २८० चौरस फूट जागा आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांमध्ये इतकी जागा उपलब्ध नसते. काहीजणांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. यामुळे लाभार्थी वंचित राहिल्याचे आमदार देशमुख म्हणाले.
जागेची अट शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी अजित गायकवाड, अजित गादेकर, नारायण बनसोडे, गौतम कसबे, आदी उपस्थित होते.महापालिकेच्या समितीचे समुदाय संघटक चुकीच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांनी अर्जदारांकडून व्यवस्थित कागदपत्रे भरून घेणे. जागेचा व्यवस्थित सर्व्हे करणे, आदी कामे करायला हवी होती. त्यामुळे या सर्वेक्षणाची चौकशी करावी, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केली. यावेळी गौतम नागटिळक, धीरज वाघमोडे, दीपक वाघमारे, नितीन शिरसठ, मुन्ना आखाडे, आदी उपस्थित होते.