क्रिकेटपटू, सिनेअभिनेते जंगली रमी खेळण्याचे आणि पैसे कमावण्याचे आवाहन करत असतात. त्याचे तंतोतंत पालन महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे करताना दिसले. त्या वरून लातूरमध्ये राडा झाला. एरव्ही मनसे नेते राज ठाकरे यांना ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’? असा मुंबईत पडणारा प्रश्न आता लातूरमधून विचारण्याची वेळ आली. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हीडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे (श. प.) आमदार रोहित पवार यांनी हा व्हीडीओ शेअर केला असून त्या वरून आता कोकाटेंवर टीकेची झोड उठली आहे. शेतक-यांच्या कर्जमाफी प्रकरणावरून सरकार किती खोटारडे आहे ते सिद्ध झाले आहे. शेतक-यांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे तो खचून गेला आहे. वय झाले तरी परिस्थितीमुळे नांगर खांद्यावरून ओढण्याची त्याच्यावर वेळ आली आहे आणि तिकडे उध्दटपणाने वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत आहेत. रमी आणि रमाचा नाद वाईटच! जंगली रमी, जुगारामुळे तरुणाईमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. तरुणाईने कोकाटेंचा काय आदर्श घ्यावा? सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
चोहोबाजूने टीकेची झोड उठली असताना राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष, प्रवक्ते सूरज चव्हाण माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, जाणीवपूर्वक हे चालू असावे. कोकाटे मोबाईलवर काही स्क्रोल करताना त्यावर काहीतरी दिसले असावे. अशा पद्धतीचे वर्तन कोकाटेंकडून होणार नाही, असा मला विश्वास आहे. कारण ते मोबाईल पाहताना त्यावर काहीतरी आले असावे. सभागृहात त्यांनी त्यांचे काम केले असेल. जे काही झाले ते चुकीचे आहे. त्यांनी सभागृहाचा दर्जा राखायला हवा. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना समज देतील. शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत म्हणाले, दोन शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लातूरहून मुंबईला चालत आले. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कृषिमंत्र्यांकडे वेळ नाही. कुणाचे व्हीडीओ पैशांच्या बॅगेबरोबर दिसत आहेत. कुणी आमदार निवासात मारहाण करत आहे तर कुणी सभागृहात मोबाईलवर गेम खेळत आहे. अमित शहा यांनी ४ मंत्र्यांना डच्च्यू देण्यासाठी यादी बनवली असून त्यात कोकाटे यांच्याही नावाचा समावेश आहे.
प्रहार संघटनेचे नेते, माजी आमदार बच्चू कडू म्हणाले, विवाह समारंभावर होणारा खर्च आणि मद्यपानामुळे शेतकरी कर्जबाजारी आहेत, असे सरकारमधील लोक म्हणतात; पण आमचे कृषिमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील तर शेतक-यांचे काय भले होणार आहे? शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतक-यांना वन्य प्राण्यांचा हैदोस सहन करावा लागत आहे, उभे पीक उद्ध्वस्त होताना पहावे लागत आहे. मोबाईलवरून खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे ते पाहण्यासाठी यूट्युबवर गेलो असता सदर जाहिरात सुरू झाली. मी लगेच ती स्कीपही केली, असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूर दौ-यावर होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्या वेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंसह कार्यकर्त्यांसह कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानसभा सभागृहातील कथित रमी खेळण्याच्या व्हीडीओवरून तटकरे यांना निवेदन दिले आणि पत्ते समोर फेकत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तटकरे यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर छावाचे कार्यकर्ते दुस-या रूममध्ये बसलेले असताना राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्ते छावाच्या कार्यकर्त्यांवर तुटून पडले आणि जबरदस्त मारहाण केली.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अपशब्द वापरल्याने जशास तसे उत्तर दिले, असे सूरज चव्हाण म्हणाले. सत्तेत आहोत म्हणून सगळेच काही चुकीचे करतोय असे नाही, असेही ते म्हणाले. लातूरमध्ये रविवारी जे काही घडले त्याबद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मारहाण करणे चुकीचे आहे. सूरज चव्हाण या मारहाणीत असतील तर ते चुकीचेच आहे. मी याचे समर्थन करणार नाही, असे सुनील तटकरे म्हणाले. मारहाणीनंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी मारहाणीचा हिशेब चुकता करू, असे म्हटले आहे. सत्तेचा माज काय असतो ते बघायला मिळाले. अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, ही शेतक-यांची मुले आहेत. आमच्या मागणीला तुम्ही लाथा-बुक्क्यांनी प्रतिसाद दिला, याचा हिशेब चुकता करणार, असा इशारा घाडगे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी ‘लातूर बंद’ची हाक देण्यात आली होती. सोमवारी सुनील तटकरे धाराशिव दौ-यावर होते. त्या वेळी छावा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
नांदेडमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उभारण्यात आलेली पोस्टर्स फाडण्यात आली तर हिंगोलीमध्ये रस्त्यावर टायर पेटवून मारहाणीचा निषेध करण्यात आला. नाशिकमध्ये शेतकरी संघटनेने निषेध आंदोलन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमधील मारहाणीची घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला आहे. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात केले जाणारे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, त्यासाठीच हा कठोर निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. सूरज चव्हाण यांची अजित पवारांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता अशी ओळख होती. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे रहिवासी आहेत. छावा ही राज्यातील प्रमुख मराठा संघटनांपैकी एक संघटना आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपदही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. सूरज चव्हाणांसह १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.