33.3 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमहाराष्ट्ररवींद्र धंगेकर ‘हाता’ची साथ सोडणार

रवींद्र धंगेकर ‘हाता’ची साथ सोडणार

काँग्रेसला मोठा धक्का!; शिंदे गटात जाण्याचा निर्णय

पुणे : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात अवघा एक आमदार असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘हाता’ची साथ सोडणार असल्याचे सांगितले आहे. धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. धंगेकर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ( १० मार्च ) भेट घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलं नाही, त्याच्यासोबत काम करायचं आहे. काँग्रेस सोडत असताना वाईट वाटतं आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले.

लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय न्याय देऊ शकत नाही
रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘‘१० ते १२ वर्षे काँग्रेसमध्ये काम करत असताना पक्षातील अनेकांसोबत कौटुंबिक नाते तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांनी माझ्या पाठीशी ताकद उभा केली. मी निवडणुकीत पराभूत झालो, हा नंतरचा विषय आहे. पण, सगळ्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे कष्ट केले. एखादा पक्ष सोडताना दु:ख होते. लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही.’

एकनाथ शिंदेंनी आमदार असताना मदत केली
मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटले, ‘आमच्यासोबत काम करा.’ याबद्दल आम्ही बरीच चर्चा केली. एकनाथ शिंदेंनी मी काँग्रेसचा आमदार असतानाही मला मदत केली. असे लक्षात आले की, ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचला आहे. त्यांच्यासोबत काम करायला हरकत नाही, अशी मानसिकता झाली. मी आज माझा निर्णय घेतला, आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करावे. आमची संध्याकाळी सात वाजता भेट होईल. नंतर आमचा निर्णय होईल,’’ असं धंगेकर यांनी म्हटले.

काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले
मी पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. माझी विचारसारणी मानवतावादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानसभा, लोकसभा, अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते, कोणाला निवडून द्यायचे, कोणाला नाही द्यायचे. काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही, काम करणारे आणि प्रेमळ आहेत. पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठीशी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभे राहून माझा पराभव झाला. मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणे सोपे नाही. मात्र, माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केले. आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वांचे नाते आहे. त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले, असे धंगेकर यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे
माझा कोणाच्या बांधाला बांध नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नव्हती. त्यांनी मला भरभरून दिले. पण, राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात. कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणे गरजेचे आहे, असे धंगेकर यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR