अहमदपूर : प्रतिनिधी
विज्ञानातील प्रत्येक शोध हे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतात त्यातूनच मानवाने आपली प्रगती साधलेली आहे. रसायनशास्त्र हा विषय मानवाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असून मानवी आरोग्याचे व रसायनशास्त्राचे खूप जवळचे नाते आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे, असे मत राष्ट्रीय रसायनशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रामचंद्र शेळके यांनी व्यक्त केले.
आधुनिक भारताचे रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य प्रफुल्लचंद्र रे. यांचा २ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन म्हणून पाळला जातो. याचेच औचित्य साधून महात्मा गांधी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रेसेंटेशन, सेमिनार व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळाचे कोषाध्यक्ष रामचंद्र शेळके हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रसायनशास्त्र आणि मानवी आरोग्याचा असलेला संबंध सांगितला. तसेच मानवी आरोग्याचा प्रश्न आज गंभीर बनला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यासातून तो सोडविण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी रसायनशास्त्र या विषयातील नवीन शोध व वर्तमान कालीन बदल सांगितले तसेच विज्ञान विषयामध्ये प्रॅक्टिकल महत्त्वाचे असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल लॅबमध्ये अधिकाधिक वेळ द्यावा असे ते म्हणाले.
सिनेट सदस्य डॉ. विनोद माने यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री, इन ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री या विषयी माहिती दिली. डॉ. अशोक कराड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विचारपीठावर संस्थेचे सहसचिव सुरेशराव देशमुख, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. शिवलकर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. बी. देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण १९ विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशनमध्ये भाग घेतला. यात प्रथम- कु. शिवानी बोराडे (बी.एस्सी. द्वितीय), द्वितीय- आदिती राठोड (बी.एस्सी. द्वितीय), तृतीय-शैलजा कुंभार (बी. एस्सी. प्रथम), सेमिनारमध्ये उत्कृष्ट ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे- प्रथम- खाटीक सानिया (एम. एस्सी. द्वितीय), द्वितीय- चिखलबिडे शैलेश (बी.एस्सी. प्रथम), तृतीय- सूर्यवंशी अर्पिता (बी.एस्सी. तृतीय). प्रास्ताविक व आभार रसायनशास्त्र विभाग प्रमुख तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. अनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अशोक कराड यांनी केले. याप्रसंगी डॉ. सी. टी. लोंढे, प्रा. बी. यू. मंगरूळकर, डॉ. जी. एस. बयास, प्रा. प्रसाद महाळंकर, प्रा. पूजा साळवे, प्रा. मोहिनी मोरे तसेच सतीश हुमनाबादे, गिरधर बंडेवाड व विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
















