बहुचर्चित, बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागले. या निकालाकडे सा-या देशाचे लक्ष लागले होते. मुख्य लढत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्यांत होती. निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित यश मिळाले, नुसते यश नव्हे तर राक्षसी बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचे अक्षरश: पानिपत झाले. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज ज्येष्ठ नेते पराभूत झाले. त्यामुळे महायुतीला राक्षसी बहुमत मिळवणे सहज शक्य झाले. आता सत्ताधा-यांना विरोधकच उरला नाही. लोकशाहीच्या दृष्टीने ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. विरोधकच नसल्याने सत्ताधा-यांना रान मोकळे झाले आहे. एकूण २८८ पैकी २३६ जागा महायुतीला मिळाल्या. त्यात भाजपचा वाटा १३७ जागांचा, शिवसेनेचा (शिंदे) ५८ तर राष्ट्रवादीचा (अजित पवार) ४१ जागांचा आहे. महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर विजय मिळाला. त्यात काँग्रेसला १५, शिवसेना (उद्धव ठाकरे) २० तर राष्ट्रवादीला (शरद पवार) १४ जागा मिळाल्या. ३ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर होऊ लागल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचे धक्के बसू लागले.
मतदानोत्तर चाचण्या आणि राजकीय पंडितांसह सर्वपक्षीय नेत्यांसाठी हे निकाल अनपेक्षित ठरले. आपला पूर्णत: सुपडासाफ होईल असे मविआच्या नेत्यांनाही वाटले नव्हते आणि जनतेत आपण इतके ‘लाडके’ असू याची सत्ताधारी महायुतीलाही अपेक्षा नव्हती. एकूण महाराष्ट्रातील जनतेच्या मतवर्षावात ‘मविआ’ला विरोधी पक्षनेत्याचे पदही मिळणे कठीण झाले आहे. मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिस-या आघाडीसह अनेक छोटे-मोठे पक्ष भुईसपाट झाले आहेत. सत्ताधा-यांना ‘लाडक्या बहिणीं’नी भाऊबीजेची ‘रिटर्न गिफ्ट’ दिल्याचे मतमोजणीत दिसून आले. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे मुस्लिम महिलांची मतेही महायुतीकडे वळल्याचे चित्र आहे. महायुतीच्या विविध लाडक्या योजनांमुळे लोकसभेच्यावेळी असलेले महायुतीविरोधातील चित्र पूर्णत: पालटले असून विरोधी पक्ष भुईसपाट झाले आहेत. मविआला फक्त ४९ जागा मिळाल्याने ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अनेक मतदारसंघांत मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, बाळा नांदगावकर, नवाब मलिक, राजेश टोपे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार आदींचा समावेश आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता पण विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत त्यांनी संपूर्ण चित्रच बदलून टाकले. लोकसभेच्या तुलनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत सुमारे ७० लाख वाढीव मतदान झाले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढलेला दिसला. एकूण मतदानाची टक्केवारी वाढली की त्याचा फटका सर्वसाधारणपणे सत्ताधा-यांना बसतो असे आजवर दिसून आले परंतु यावेळी सारे काही उलटे झाल्याचे दिसून आले.
महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळाल्याने शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे असा शिंदे गटाचा दावा आहे. तर भाजप जागांच्या बाबतीत बहुमताच्या जादुई आकड्याजवळ पोहोचला असल्याने भाजपचा मुख्यमंत्री असावा असे भाजपचे म्हणणे आहे. अजित पवार गट मात्र मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. खरा पक्ष कोणाचा हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात न्याय मागणा-यांचा विधानसभा निवडणुकीत जनतेने करेक्ट कार्यक्रम केला अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाविकास आघाडीला आपण सत्ता स्थापन करू असा विश्वास वाटत होता. परंतु ते अपयशी ठरले. उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री होऊ अशी आशा होती. परंतु त्यांचे ते स्वप्नच ठरले. आघाडीच्या प्रचाराची दिशा चुकली, त्यांच्यात कुठेही एकवाक्यता नसल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आघाडी हवेत होती असेही म्हटले जात आहे. या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरला तो ओबीसी फॅक्टर आणि लाडकी बहीण योजनेचा कल.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश व राजस्थान राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा मध्य प्रदेशात भाजपच्या विरोधात वातावरण होते परंतु शिवराजसिंह चौहान सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. महायुती सरकारने त्याचीच कॉपी करत महाराष्ट्रात पुन्हा सत्ता हस्तगत केली. महायुतीच्या विरोधात वातावरण असताना भाजपने जी काही रणनीती आखली ती पूर्णपणे यशस्वी ठरली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. त्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी राज्यात घेतलेल्या सभा, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी केलेला झंझावाती प्रचार निर्णायक ठरला. याउलट महाविकास आघाडीकडे आश्वासक असा चेहराच नव्हता. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्याभोवतीच प्रचार फिरत राहिला. राहुल गांधी यांच्या आणखी सभा व्हावयास हव्या होत्या. तब्येतीमुळे शरद पवार यांना जादा प्रचारसभा घेता आल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांनी फक्त पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर थेट टीका करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे जनतेने आघाडीला नाकारल्याचे दिसते.
या निवडणुकीत आघाडीचे कुठेही सूक्ष्म नियोजन दिसले नाही. भाजपने संघाची मदत घेत आधीपासूनच सूक्ष्म नियोजन केले होते. शिवाय विविध राज्यांतील भाजपच्या नेत्यांना बोलावून घेत प्रचार व चिंतन बैठका घेतल्या होत्या. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे यांनी तीव्र केला होता. परंतु त्यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत केलेली एकेरी टीका आघाडीला भोवली. सरकार मराठा समाजाला जवळ करत आहे आणि ओबीसींना दूर सारत आहे अशी भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आणि त्याचा फटका आघाडीला बसला असावा. विधानसभा निवडणुकीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.