मुंबई : प्रतिनिधी
हॉरर आणि सस्पेन्स पाहायला आवडणा-या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बालाजी मोशन पिक्चर्स त्यांच्या अत्यंत यशस्वी ‘रागिनी’ फ्रँचायझीचा नवा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. यावेळी, चित्रपटाचा कॅनव्हास पूर्वीपेक्षा मोठा आणि अधिक स्टायलिश असणार आहे. मुख्य भूमिकेसाठी तमन्ना भाटियाचा विचार केला जात आहे, तर तिच्यासोबत आमिर खानचा मुलगा जुनैद खान असू शकतो.
वृत्तानुसार, ‘रागिनी ३’ हा चित्रपट एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि प्रसिद्ध दिग्दर्शक शशांक घोष दिग्दर्शित करतील. शशांकने यापूर्वी ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘फ्रेडी’ सारखे यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यावेळी निर्मात्यांचे लक्ष प्रेक्षकांना बोल्ड आणि स्टायलिश असा ‘हॉरर अनुभव’ देण्यावर आहे. या चित्रपटात डान्सिंग क्वीन तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांच्या मते, या भूमिकेसाठी तमन्ना नेहमीच पहिली पसंती होती. तमन्ना आणि जुनैदची केमिस्ट्री पडद्यावर पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. ही जोडी चित्रपटात ग्लॅमर आणि बोल्डनेस वाढवेल.
जुनैद खान त्याच्या आगामी ‘एक दिन’ चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवीसोबत दिसणार आहे. ही रोमँटिक स्टोरी १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर, तमन्ना तिच्या ‘ओडेला २’ या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही पण तमन्नाच्या भूमिकेचे भरभरून कौतुक चाहत्यांनी केले.

