छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : माणसे खूप चांगली आहेत. त्यांच्यात एकमेकांविषयीं आदर आहे. त्यामुळे केवळ राजकारणामुळे माणसांत भेदभाव होऊ नयेत. एवढी काळजी आपण घेतली पाहिजे अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. या खुल्या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, डॉ. पी. डी. पाटील, विजय दर्डा, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष डॉ. प्रकाश पागे, संमेलन आयोजक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा आदी उपस्थित होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या, समाजाच्या सर्व स्तरातील, विचारधारेतील सर्वांना साहित्य संमेलनाचे अप्रूप आहे.
प्राथमिक शिक्षणापासून मराठी शाळा चांगल्या राहतील याची दक्षता घ्यायला हवी. मराठी भाषा, माणूस टिकला तर संस्कृती टिकेल. आपल्या शाळेत परदेशी भाषा शिकवल्या जातात त्या आस्थेने मातृभाषा शिकवल्या जात नाहीत, हे वास्तव आहे. दिल्ली हा उंबरठा आहे. तो ओलांडल्याशिवाय देशातील अन्य राज्यात जाता येत नाही असेही डॉ. भवाळकर यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, संमेलनात राजकारण्यावरून टीका होते मात्र साहित्य आणि राजकारण हे एकाच समाजातील घटक आहेत. शासन संमेलनाला निधी देऊन उपकार करत नाही. साहित्यिकांनी समाजाच्या सकारात्मक बदलासाठी लेखणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे. मात्र उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहता न आल्याचे मला दु:ख आहे. वारीप्रमाणे साहित्यिक दरवर्षी संमेलनाला एकत्र जमतात. जिथे साहित्यिक जमतात तेथे साहित्याची पंढरी करतात. बेळगाव भागातील मराठी
माणसांच्या पाठीशी हे सरकार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठी भाषेच्या सर्व भाषेचा संगम म्हणजे साहित्य संमेलन. अभिजात भाषेचे हे पहिले साहित्य संमेलन आहे. निवडणुकीतनंतर आम्ही नाती जपतो. मी मराठी भाषा प्रेमी आहे. मंत्री सामंत म्हणाले, साहित्यिक व्यासपीठाला राजश्रय देण्याचे काम आम्ही करत आहोत. जवाहरालाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज आध्यासन केंद्र सुरु करत आहोत. मराठी भाषा मंत्री म्हणून शासनातर्फे दिल्या जाणा-या विविध पुरस्कार समितीचा अध्यक्ष आहे. मात्र कोणत्याही पुरस्कार समितीत हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या त्या समितीतील ज्येष्ठ साहित्यिकांना स्वातंत्र्य दिले आहे. प्रा. तांबे यांनी प्रास्ताविक केले. संजय नहार, डॉ. पी. डी. पाटील, विजय दर्डा यांनी मनोगत व्यक्त केले.