नाशिक : प्रतिनिधी
कारल्याच्या भाजीसारखे राजकारण कडू झालेय, असे म्हणत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधला. स्वराज्य पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीराजेंची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर निशाणा साधला.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आज जे राजकारण सुरू आहे ते आजवर कधीच बघितले नाही. खोके, गद्दारी बेइमानी सुरू आहे. माझा शिवसेना पक्ष कधीही काँग्रेसशी युती करणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे बोलत होते. मग उद्धव ठाकरे काँग्रेससोबत कसे गेले? खुर्चीसाठी तुम्ही तिथे गेले. मग ही गद्दारी नाही का? असा त्यांनी उपस्थित केला.
राजकारणाला कारल्याच्या भाजीची उपमा
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी ७० हजार कोटींचा आरोप करत होते. आज त्याच अजित पवारांसोबत सरकार आहे. सोनिया गांधी यांच्या परदेशीचा मुद्दा घेऊन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, नंतर पुन्हा त्यांच्यासोबत गेले. कारल्याच्या भाजीसारखे राजकारण कडू झाले आहे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी सर्वांवर हल्ला चढवला.
प्रस्थापितांनी महाराष्ट्र गिळून टाकला
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे पण तसे आपण वागतात का? आमच्याकडे शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार आहे. या सर्व प्रस्थापितांनी महाराष्ट्र गिळून टाकला. तो सदाभाऊ खोत काहीही बोलतो, त्याला उत्तर देणारा तो कुत्रा आहे म्हणतो, हा प्रचार आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.