सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा २८ फुटांचा पुतळा काही दिवसांपूर्वी पडला होता. या पुतळ्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने निविदा काढली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया काढली आहे.
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्यानंतर शिवभक्तांच्या तीव्र भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात उमटल्या होत्या. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.