शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
राज्य मान्यतेमुळे मराठी भाषा समृद्ध व्हायला मदत मिळणार असून मराठीच्या समृद्ध वारशामुळे जुने साहित्य नव्याने लिहिता येईल, मराठी भाषेची उत्पत्ती समजावून सांगावी लागेल व मराठी भाषा जपण्यासाठी संमेलने परिसंवाद चर्चा अशी अनेक उपक्रमे घ्यावी लागतील असे सांगताना आजच्या तंत्रामुळे जगण्याचं मंत्रच हरवले असल्याची खंत ही डॉ. राजकुमार मस्के यांनी व्यक्त केली.
शिरूर अनंतपाळ येथील चौथ्या दोन दिवसीय मराठी संमेलनात दुस-या सत्रातील अभिजात मराठी भाषा ; संधी व आव्हाने या विषयांवर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार जयप्रकाश दगडे तर मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे,साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे व सदस्य भारतभाऊ कोंडेकर यांची उपस्थिती होती.
मराठी भाषा ही मुळ असून ती काही संस्कृतपासून आली नसून राजकर्त्यांच्या उदासिनतेमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब झाला असून प्रशासकीय स्तरांवर मोठी उदासिनता असल्यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्याच्या भवितव्याबद्दल साशंकता वाटते असे मत पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी अध्यक्षीय समारोपात मांडले. या परिसंवादाचे प्रास्ताविक देवदत्त मुंढे यांनी केले. सुत्रसंचालन राजु आचवले यांनी तर आभार चद्रिेवार सर यांनी मानले.
तिस-या सत्रात घेण्यात आलेल्या कथा कथन कार्यक्रमातून कथाकार दिगंबरराव कदम यांनी पांगुळ या कथेच्या सादरीकरणातून धमाल उडवून दिली. तर यात सहभागी जेष्ट साहित्यीक धनंजय गुडसुरकर व राम तरटे यांनी कथा कथनातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक कुमार बंडे यांनी केले. सुत्रसंचालन धनाजी लखनगावे यांनी तर आभार रमेश उंबरगे यांनी मानले.सायंकाळी घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी धमाल उडवून दिली. या कार्यकृमाला शहरातील सर्व शाळा व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यासाठी संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे, उपाध्यक्ष गुरुनाथ शिंदाळकर सचिव प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे, प्रसिद्ध व्याख्याते इंजि.किरण कोरे व संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.