जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थान विधानसभेत आठवडाभर सुरू असलेला पेच सुटला आणि सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांचे निलंबनही रद्द करण्यात आले.
मंत्री अविनाश गहलोत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानावरून ठप्प झालेले कामकाज मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा सुरू झाले. शर्मा यांनी विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी आणि विरोधी पक्षनेते टीकाराम जुली यांची बैठक घेतली व चर्चा केली. संपूर्ण समाधान झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात प्रवेश केला, तसेच कामकाजात सहभाग नोंदवला.
ठप्प झालेले कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. काँग्रेस आमदार गोविंद सिंह डोटासरा यांनी अध्यक्षांबाबत वापरलेल्या शब्दांबाबत त्यांच्या वतीने माफीही मागितली. यानंतर डोटासरा यांच्यासह सहा आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकारचा प्रसंग आलाच तर कामकाज फार काळ ठप्प होता कामा नये.
दरम्यान, विधानसभेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे काँग्रेसने गुरुवारी सभागृहाबाहेर मॉक सेशन घेतले. फलक घेतलेल्या काँग्रेस सदस्यांनी सभागृहाकडे मार्च काढला व सभागृहाच्या परिसरात घोषणा दिल्या. आपल्या वक्तव्याबाबत मंत्र्यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती.