जालना : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी घनसावंगी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ बोलताना दिले. कोरोना काळात आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी जनतेची सेवा केली. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले, असेही शरद पवार म्हणाले.
ज्यावेळी देशाची लोकशाहीची निवडणूक होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिका मांडत होते. या भूमिकेतून शेतक-यांचे प्रश्न, उद्योगांचे प्रश्न मांडण्याऐवजी त्यांना चारशे जागा पाहिजे होत्या. परंतु या चारशे जागा मिळण्यासाठी त्यांना संविधानात घटनेत बदल व छेडछाड करायची होती. परंतु काँग्रेस, शिवसेनेसह देशातील सर्वच डाव्या पक्षांना सोबत घेऊन देशाच्या नावाने इंडिया आघाडी स्थापन करून त्यांना रोखण्यात यश मिळवले.
या इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या, तर त्यांना केवळ १७ जागा मिळाल्या. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येत असून या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन पक्ष राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस, डावे पक्ष यांची महाविकास आघाडी स्थापन केली आणि सत्ता बदलायची आहे. यासाठी सर्वसामान्यांच्या संसारात बदल झाला पाहिजे. सामान्य माणसाचे जीवनमान त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करायचे आहे.
विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्यासमोर दुसरी शक्ती आहे. दुस-या शक्तीकडे मोदींचा पाठिंबा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर तुम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो, असा त्यांना विश्वास आहे. मात्र लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे आहे त्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस कधी लोक विसरणार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राची निष्ठा काय असते हेही कळेल, असेही शरद पवार म्हणाले.
राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तर दुसरीकडे राज्यात लैंगिक अत्याचाराच्या ८९० घटना घडल्या, महिला असुरक्षित आहेत. राज्यात राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यांच्या कामाचे देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले त्यामुळे त्यांनी जालन्याचे नाव मोठे केले.