मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेवर महायुती सरकारकडून सात आमदारांची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असून या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या असल्याचा दावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २३ ऑक्टोबरला निकाल येणार होता. या नियुक्त्या असंविधानिक पद्धतीने झाल्या असून, याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर २३ ऑक्टोबरला निकाल देणार होती. तरी देखील राज्यपालांकडे नावे पाठवली. सात आमदारांची नियुक्ती करून घेतली. असंविधानिक पद्धतीने या नियुक्त्या होत आहेत. आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्याय मागणार आहोत. या सात आमदारांची नियुक्ती करायची होती, त्यामुळेच त्यांनी निवडणूक पुढे ढकलली, असा संशय आम्हाला आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. परंतु तशी भूमिका दिसत नाही, असा देखील टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. निवडणूक आयोगाने दहा दिवस राज्य सरकारला सूट दिली. यातून सरकारची जाहिरातबाजी सुरू होती. सरकारची तिजोरी साफ करण्याचे काम झाले. यांना मत मागण्याचा अधिकार देखील नाही. महिला सुरक्षित नाहीत. मुली सुरक्षित नाही.
शांतता-सुव्यवस्था राज्यात नाही. आमदारांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. महाराष्ट्राला नऊ लाख कोटींपेक्षा जास्त कर्जात बुडविले. ३० टक्के कमिशनमध्ये बुडवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात कमिशन खात आहे, त्यावर हे किती खालच्या पातळीवर घसरले आहे, हे दिसते, अशी टोलेबाजी विजय वडेट्टीवार यांनी केली.
तसेच लाडकी बहीण नुसतं करून होत नाही, तर तिची सुरक्षा देखील महत्त्वाची असते. या लाडक्या बहिणींची सुरक्षा आम्ही करणार आहोत, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.