मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे.
महायुतीने विधानसभा निडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारा लाभ २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतक-यांची कर्जमाफीही करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, दि. ३ मार्च ते बुधवार, दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात तरी ही दोन्ही आश्वासने पूर्ण केली जाणार का, याकडे जनतेचे लक्ष आहे.
विधान भवन मुंबई येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, शंभुराज देसाई, आमदार सर्वश्री. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, अॅड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार, दि. ८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. १३ मार्च २०२५ रोजी होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
लाडकी बहीण योजनेवरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निडणुकीत मोठे अपयश आले होते, त्यानंतर महायुती सरकारने विधानसभा निडणुकीआधी लाडकी बहीण योजना लागू केली आणि निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. मात्र २१०० पर्यंत लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. शिवाय निवडणुकीनंतर या योजनेतून अनेक महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही खळबळजनक दावा केला आहे.