मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ई-कॅबिनेट संकल्पना राबविण्याचे सूतोवाच केल्यानंतर त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी मंत्री आणि अधिका-यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. या ई-कॅबिनेटसाठी आवश्यक टॅबची हाताळणी आणि सॉफ्टवेअरबाबत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
देशातील जवळपास पाच राज्यांत ई-कॅबिनेटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही लवकरात लवकर ही संकल्पना राबविण्याचा फडणवीस सरकारचा मानस आहे.
पारदर्शक आणि गतिमान कारभारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचा संकल्प फडणवीस यांनी सत्तेत येताच केला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकाही ई-कॅबिनेटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यादृष्टीने विविध विभागांतील महत्त्वाच्या अधिका-यांना ई-कॅबिनेटचे प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि खुद्द मंत्र्यांनाही याबाबतची माहिती दिली गेली.
कागदाची बचत
राज्य सरकारचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठकच ई-कॅबिनेटवर आल्यास कारभार पेपरलेस करण्यास गती मिळणार आहे. विशेषत:, यामुळे मोठ्या प्रमाणावर कागदांची बचत होणार आहे.