छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पीक विमा, शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी साखरपुडे, लग्न करतात, असे वादग्रस्त विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच केले. यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली. आज कोकाटे यांनी शेतक-यांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटे व राज्य सरकारला टोला लगावला.
‘माणिक’ नावाचे रत्न आहे राज्याच्या मंत्रिमंडळात. कृषिमंत्री असले तरी सावकारासारखे वागणे हा त्यांचा गुण दिसतोय. एक तर शेतक-यांच्या हक्काची नुकसानभरपाई त्यांना वेळेत न देता असले वक्तव्य करणे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशा शब्दांत दानवे यांनी कोकाटे यांना सुनावले.
जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे, कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही, अशी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली होती. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा प्रश्न त्यांनी केला होता.
सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे देत आहे, सिंचनासाठी पैसे दिले जात आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे देत सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी पीक विम्याचे पैसे मागतात मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा असे म्हणत कोकाटे यांनी शेतक-यांबद्दल चुकीचे विधान केले होते.
दरम्यान, त्यांच्या या विधानावरून राज्यभरातील शेतक-यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आज कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली. शेतक-यांची अनवधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने असे वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतक-यांचा मान-सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता नंबर कोकाटेंचा असे म्हणणा-या अंबादास दानवे यांनी कोकाटे यांचा राज्य मंत्रिमंडळातील रत्न असा उल्लेख करत त्यांना चिमटा काढला.