अमरावती : प्रतिनिधी
अलिकडे राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण एवढ्यापुरताच घेतला जातो. मात्र, राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समाजकारण समजून कृषि, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात मोठे योगदान देतानाच कुठलाही पक्षीय अभिनिवेशन न बाळगता गुणवत्तेच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. त्यामुळे शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील फार मोठे नाव आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी काढले. यावेळी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार शरद पवार यांना देऊन पुरस्काराची उंची वाढविली, असेही गडकरी म्हणाले.
राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने १२५ रुपयाचे नाणे जारी केले. या नाण्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. तसेच माजी केंद्रीय कृषि मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आला, त्यावेळी गडकरी बोलत होते. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. तसेच शरद पवार यांचेही कृषि क्षेत्रातील योगदान मोठे आहे. योगायोग म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण शरद पवार यांच्या उंचीची माणसे दरवर्षी कुठे मिळणार, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची महती सांगताना त्यांनी शेतक-यांच्या उन्नतीसाठी खूप कार्य केले. राजकारणी माणूस हा पाच वर्षांचा विचार करतो. मात्र, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भविष्याचा विचार केला आणि शेतक-यांची उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे म्हटले.
डॉ. देशमुख, पवार यांची
नावे कायम लक्षात राहतात
गडकरी पुढे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांचीच तळमळ, व्हिजन शरद पवार यांच्याकडे आहे. राजकारणाच्या दृष्टीने नेहमी राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या धुळवडीतही डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते.