23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच

खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

मुंबई : प्रतिनिधी
पावसाचे आगमन उशिरा झाल्याने जिल्ह्यात खरिपाची पेरणी मुळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतक-यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याचे पहायला मिळत आहे. त्यात ऑगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात अद्याप कुठेच शेतांमधून पाणी वाहून निघालेले नाही. त्यात आता पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दडी मारली आहे. अशा स्थितीत, फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बहुतेक सर्व पिकांची खूपच नाजूक अवस्था झाली आहे. दुपारच्या वेळी पिके ऊन धरू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतक-यांची चिंता वाढली आहे.

पावसाचे आगमन उशिरा झाल्याने जिल्ह्यात खरिपाची पेरणी मुळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतक-यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेली पिके आता नाजूक स्थितीत पोहोचली आहेत. पुरेसा पाऊस न पडल्याने आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली आहेत.

दमदार पावसाअभावी वाढीच्या तसेच फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. दमदार पावसाअभावी नदी व नाले अजूनही वाहताना दिसलेले नाहीत. विहिरींसह कूपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतक-यांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. त्यासाठी बरेच शेतकरी ठिबक, तुषार सिंचनावर भर देत आहेत. पाण्याची कोणतीच सोय नसलेल्या शेतक-यांवर मात्र आभाळाकडे पाहण्याची वेळ आली आहे

पिकांना फटका बसण्याची शक्यता
जुलैअखेरपर्यंत पावसाची थोडीफार रिमझिम सुरू राहिल्याने खरीप पिके तग धरून तरी उभी होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर तापमानाचा पारा वाढल्याने खरीप पिके आता ऊन धरू लागली आहेत. दोन-तीन दिवसांत पाऊस न पडल्यास कपाशी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसण्याची तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतक-यांनी आंतरमशागतीसह कीटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR