धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील एका कलाकेंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. याशिवाय धाराशिवमधील पाच कलाकेंद्र चालकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये कलाकेंद्रांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यामधील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. कलाकेंद्रातील नर्तकी असलेल्या पूजा गायकवाडमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर कलाकेंद्राविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे धाराशिवमध्ये कलाकेंद्र बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे.
धाराशिवमधील कलाकेंद्रांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अचानक धाड पडल्याची माहिती समोर आली आहे. नियमभंग केल्याप्रकरणी पाच कलाकेंद्रांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाशी येथील तुळजाई कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. याशिवाय महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी आणि साई या कलाकेंद्रांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
कलाकेंद्राला परवाना देताना काही नियम घातले जातात. या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून चालकांच्या विरोधात कारवाई होत असल्याचे म्हटले जात आहे. उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार, धाराशिवमध्ये कलाकेंद्राविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

