39.4 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeराज्यातील जिल्हा रुग्णालयांत केमोथेरपीची सुविधा मिळणार

राज्यातील जिल्हा रुग्णालयांत केमोथेरपीची सुविधा मिळणार

पुणे : वृत्तसंस्था
राज्यासह देशामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असं सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, वर्ग ३ व ४ ची रिक्त पदे ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कंत्राटी स्वरूपातील वैद्यकीय अधिका-यांची पदे भरण्यासाठी जिल्हा पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. राज्यात कर्क रुग्णालयांची मागणी लक्षात घेता याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल.

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्क रुग्णालय उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत रुग्णालय सूचीबद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू तसेच माता मृत्यू थांबवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग व महिला आणि बाल विकास विभाग समन्वयाने काम करेल. राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR