मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीचा अंतिम आठवडा सुरू झाला असून आता राज्यामध्ये उष्णतेची लाट पसरण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ३८ अंश सेल्सियस तापमानापर्यंतची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, राज्याला उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाली आहे. तर, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी तर दुपारच्या वेळेस घामाच्या धारा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान हे ३५ अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. तर, सोलापूर आणि नागपूरमध्ये तापमान ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. तसेच, प्रादेशिक हवामान विभागाने पुढच्या २ दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गरमी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. अशामध्ये पुढच्या दोन ते चार दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या ४ जिल्ह्यांत ष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांनी कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठीची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
मंगळवारी (२५ फेब्रुवारी) मुंबई आणि ठाण्यातील तापमान जवळपास ३८ अशांवर गेले. असे असताना कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंश सेल्सिअस अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडायला हवे.
उष्णतेची लाट
दरम्यान २६ फेब्रुवारी रोजी पालघरमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, सिंधुदुर्गात देखील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सांगली जिल्ह्यामध्ये एका बर्फगोळा विके्रत्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे ती व्यक्ती उष्माघाताचा पहिला बळी ठरली आहे.