16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील मत्स्य उत्पादन घटले

राज्यातील मत्स्य उत्पादन घटले

पनवेल : प्रतिनिधी
राज्यातील मत्स्य उत्पादन २०२३-२४ मध्ये ४ लाख ६४ हजार २८८ मेट्रिक टन झाले आहे. २०२२-२३ मध्ये मत्स्य उत्पादन ४ लाख ४६ हजार २५६ मेट्रिक टन झाले होते. म्हणजेच वर्षभरात मत्स्य उत्पादनात जवळपास ८२ हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. गंभीर बाब म्हणजे २०२३-२४ मध्ये पाच वर्षांतील सर्वांत कमी मत्स्य उत्पादन झाले आहे. यामुळे छोट्या मच्छिमारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

कोकणातील कंपन्या, कारखान्यांचे सांडपाणी थेट समुद्रात सोडल्याने मोठे प्रदूषण होत आहे. शिवाय वातावरणातील बदलाचा मत्स्य उत्पादनावर परिणाम होत आहे. एलईडी दिव्यांच्या मदतीने पर्ससीन नेटचा वापर करून केलेली मासेमारी, किनारपट्टीवर घोंघावणारी वादळे यामुळेही मत्स्य उत्पादन घटत आहे. आपल्याकडे पावसाळ्यात प्रजनन काळात मासेमारी बंद असते. या काळात दुस-या राज्यातील बोटी मासेमारी करून पसार होतात. त्यामुळेही मत्स्य उत्पादनात मोठी घट होत आहे.

माशांच्या अनेक प्रजाती दुर्मिळ
पाच वर्षांत पापलेट, शेवंड, शिंगाडा, सुरमई, घोळ, करंदी, बगा या सारख्या माशांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. बोंबीलदेखील पूर्वीच्या तुलनेत कमी मिळत आहेत. समुद्रातून खाडीमार्गे थेट भातशेतात आढळणारे जिताडे मासे आता दुर्मिळ झाले आहेत. खाडीपट्ट्यातील अनेक मत्स्यप्रजाती आता नष्टच झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR