22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeसोलापूरराज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो

राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात लातूर जिल्ह्यातील सगर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व सौ. सायली पुलकुंडवर तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी दर्शन मंडप स्काय वॉक, दर्शन रांग आदी विविध सुविधांची कामे प्रस्तावित केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सतत पाठपुरावा करीत आहेत. भविष्यात पंढरपूरात येणा-या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत ही निवडणुकीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडो जास्तीत जास्त संख्येने मतदार राजांनी भाग घेऊन देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व भाविकांचा तसेच जनतेचा सहभाग लाभो असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मानाचे वारकरी
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. सगर दापत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. हे दाम्पत्य मागील १४ वर्षांपासून नियमितपणे वारी करीत आहेत. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR