राज्य सरकारचा आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील १४ पोलिस अधीक्षकांना बढती देण्यात आली असून उपमहानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली. यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना अपर पोलिस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली. पुणे ग्रामीणच्या पंकज देशमुख यांना पुणे शहर अपर पोलिस आयुक्तपदी बढती मिळाली. आयपीएस मोक्षदा पाटील यांना राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलिस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती दिली.
शासनाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने या पदोन्नती बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भातील शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र.१ च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१) च्या कलम २२ मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिस अधीक्षकांमध्ये प्रसाद अक्कानवरू, पंकज देशमुख, अमोघ गावकर, जी. श्रीधर, मोक्षदा पाटील, राकेश कलासागर, प्रियंका नारनवरे, अरविंद साळवे, सुरेश मेंगडे, धनंजय कुलकर्णी, विजय मगर, राजेश बनसोडे, विक्रम देशमाने, राजेंद्र दाभाडे आदींचा समावेश आहे.