पुणे : प्रतिनिधी
राज्यातील १६३ साखर कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत.ऊस उत्पादक शेतक-यांना देण्यात येणा-या एफआरपीत गेल्या पाच वर्षांत पाच वेळा वाढ देण्यात आली आहे. परिणामी या वर्षी १३२ कारखान्यांची एफआरपी राहिली असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना सांगितली.
दरम्यान राज्यातील १६३ साखर कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत तर साखर उतारा ९.४३ टक्के मिळाला असून साखरेचे उत्पादन ७८७ .६७ लाख क्विंटल झाले असून ऊस गाळप ८३४ .८८ लाख मे. टन झाले असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आली. यंदाच्या हंगामात एकूण २०० साखर कारखान्यांनी हंगाम घेतला त्यामध्ये ९९ सहकारी साखर कारखाने आहेत.
साखर उत्पादनात यंदा अनपेक्षित घट झाली आहे. साखर कारखान्यांसाठी चिंता वाढवणारी बाब म्हणावी लागेल. ऊस उत्पादक शेतक-यांना देण्यात येणा-या एफआरपीत गेल्या पाच वर्षांत पाच वेळा वाढ देण्यात आली आहे. हा दर २७५० वरून ३४०० वर पोहोचला आहे. तर दुस-या बाजूला साखरेचा विक्री दर २९०० वरून अवघा ३१०० वर गेला आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी १३२ कारखान्यांची एफआरपी प्रलंबित असल्याचे दिसून येते.
साखर उद्योगाने राज्याच्या अर्थकारणाला चालना दिली. हाच उद्योग यंदा मोठ्या अडचणीत आहे. साखर उत्पादनातील लक्षणीय घट तसेच साखरेचा उत्पादन खर्च आणि कारखान्यांना मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यातूनच साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. याचा परिणाम साखर दरावर होणे शक्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वर्षात किमान १४० ते १५१ दिवस साखर हंगाम चालतो. यावर्षी सरासरी ९९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित होते. साखर उत्पादनाचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे.