मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बहुतांश भागातील तापमानात आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कारण उत्तरेकडून येणा-या शीत लहरींमुळे महाराष्ट्रात गारवा वाढला होता. पण आता उत्तरेकडून येणा-या शीतलहरींचा वेग कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील थंडीवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील आठवड्यात तीन ते चार दिवस राज्याच्या तापमानात कमालीची घट झाली होती. नाशिक, धुळे, पुणे या जिल्ह्यातील तापमान एक अंकी आकड्यावर घसरले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. उत्तरेकडून येणा-या शीत लहरींमुळे महाराष्ट्रात गारवा वाढला होता. आता राज्यातील बहुतांश भागातील तापमानात आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे आता चारच दिवसांत राज्यातील थंडी गायब झाली आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी भागावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील धुळे, निफाड या ठिकाणी किमान तापमानाचा आकडा १४ अंशांच्याही वर गेल्याने थंडी कमी होत असल्याचे आता पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातही दुपारच्या वेळी जाणवणा-या उकाड्यात प्रचंड वाढ होताना दिसत असून, हा उष्मा सायंकाळपर्यंत जाणवत असून राज्यातून दडी मारलेली ही थंडी पुढचे ४८ तास तरी परतीच्या वाटेवर येणार नसल्याचे म्हटले जात आहे
अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण
महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणातील अंतर्गत भागासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ असेल. ज्यामुळे वातावरणात एक विचित्र स्थिती जाणवणार असून, हा परिणाम पुढचे दोन ते तीन दिवस कायम असल्याचे पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्येसुद्धा दुपारचा उकाडा जाणवेल आणि रात्रीच्या वेळी तसेच सकाळी थोडाफार गारवा जाणवेल.

