मुंबई : प्रतिनिधी
पुरोगामी महाराष्ट्रात आज महिलांना सुरक्षेसाठी झगडावे लागते आहे, याबाबत खंत व्यक्त करतानाच यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी सरकारने तुटपुंजी तरतूद केली असून दरवर्षी ६४ हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात, त्यांचे काय होते? यावरही वडेट्टीवार यांनी टीका केली.
दरम्यान, राज्यातील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. यावरून काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत चिंता व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात आज महिलांना सुरक्षेसाठी झगडावे लागते आहे, याबाबत खंत व्यक्त करतानाच यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी सरकारने तुटपुंजी तरतूद केली, यावरही वडेट्टीवार यांनी टीका केली.
पुणे बस स्थानकात एका महिलेवर अत्याचार झाला, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली, ही उदाहरणे देतानाच महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण, असा सवाल सरकारला केला. एनसीआरबीची आकडेवारी सांगते की, महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. दिवसाला १२६ गुन्हे नोंदवले जातात तर बालकांविरोधात दररोज ५५ गुन्ह्यांची नोंद होते. दरवर्षी ६४ हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात, त्यांचे काय होते?
अशी परिस्थिती असतानाही सरकार अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी कुठेही पुरेशी तरतूद करताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निर्भया योजने अंतर्गत महिला मदत कक्षाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात फक्त दोन हजार रुपये तरतूद केली आहे. या सरकारला निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना शिंदे गटाने निर्भया फंडचा गैरवापर केला तेव्हा टीका केली होती, आज अजित दादा यांनाच निर्भया फंडचा विसर पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. अर्थसंकल्पात महिला सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी ८ हजार रुपये दिले आहेत, एका मंत्र्यांच्या कार्यालयात चहा-नाश्त्यासाठी देखील याहून अधिक खर्च होतो अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
समाजात द्वेष पसरवला जातोय
नागपूरमध्ये हिंसाचार भडकला यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका चित्रपटाला दोष दिला. पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान,अशी सतत भडकाऊ वक्तव्ये होत आहेत. त्या मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला यांच्यावर कारवाई होत नाही. समाजात तुम्ही द्वेष पसरवणार आणि सरकार जबाबदारी कशी झटकू शकते, असे सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.