जालना : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत १० जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. जालन्यात वाळूच्या टिप्परमुळे पाच मजुरांचा मृत्यू झाला, तर समृद्धी महामार्गावर अपघातात सहा जण जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर रस्त्यावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले आणि गोंदिया येथे ट्रक अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात सुरक्षेबाबत चिंता निर्माण होत आहे. जालन्यामध्ये वाळूच्या टिप्परमुळे ५ मजुरांचा मृत्यू झाला. अवैध पद्धतीने वाहतूक केल्या जाणा-या वाळूचा टिप्पर घरावर ओतल्याने त्या वाळूखाली दबून एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबादमध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे. पासोडी शिवारातील पुलाच्या बांधकामासाठी हे कुटुंब आले होते.
बांधकामाच्या नजीकच एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आपला संसार थाटलेला होता. शनिवारी (२२ फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असून अवैध वाळू वाहतुकीचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच प्रयागराजच्या दिशेने जाणा-या मुंबईतील नागरिकांचा अमरावतीत समृद्धीवर अपघात होऊन ६ जण गंभीर जखमी झाले. तर रत्नागिरी-नागपूर मार्गावर भोसेजवळ चारचाकी आणि दुचाकीचा मध्यरात्री जोरदार अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये नवरा, बायको आणि अवघ्या १ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी मार्गावर भरधाव वेगात येत असलेला ट्रक समोरच्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात चालक व वाहक ठार झाले. अपघातांची मालिका राज्यात सुरूच असून नागरिकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईतील नागरिकांचा समृद्धीवर अपघात..
प्रयागराजला जाणा-या मुंबईतील नागरिकांचा अमरावतीत समृद्धी मार्गावर अपघात झाला. यामध्ये ६ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील चॅनेल नंबर ११४ जवळ हा अपघात झाला. जखमींना उपचारांसाठी तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
कार-बाईकची धडक; ३ ठार
रत्नागिरी-नागपूर मार्गावर भोसेजवळ चारचाकी आणि दुचाकी गाडीमध्ये मध्यरात्री जोरदार अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील तिघे मृत्युमुखी पडले. त्यामध्ये नवरा-बायको आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ऊसतोड कामगार होते. ऊसतोड हंगाम संपल्याने हे जोडपे लहान मुलासह दुचाकीवरून परत गावी जात असताना मध्यरात्री भोसे गावाजवळ हा अपघात झाला.
ट्रकच्या धडकेत २ ठार
गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी मार्गावर भरधाव वेगात येत असलेला ट्रक समोरच्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात चालक व वाहक ठार झाले. मासुलकसा घाटाजवळ ही घटना घडली. चालक साजिद खान (३०) व वाहक सादाब खान (२८) अशी मृतांची नावे आहेत.