27.1 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात अवकाळीचा धुमाकूळ

राज्यात अवकाळीचा धुमाकूळ

पुण्यात २ तासांत दाणादाण, वादळाचाही तडाखा
पुणे : मुंबई, पुणे, कोकणासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारीही वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. पुण्यात तर अवघ्या दोन तासांत पावसाने दाणादाण उडवली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, दुचाकी पाण्यात वाहून गेल्या. यासोबत वादळी वा-यात होर्डिंग्ज कोसळले. झाडे उन्मळून पडली. तसेच वीज कोसळून मोठे नुकसान झाले.

पुणे शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होते. या पाण्याच्या वेगाने गाड्या वाहून गेल्या. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे वीज कोसळून कांद्याची बराख खाक झाली. तसेच सणसवाडी येथे टॉवर कोसळून वाहनांचे मोठे नुकसान झाले. यासोबतच मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. मुंबईसह पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. साता-यात कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाईल टॉवर कोसळले. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही वादळी वा-यासह पाऊस झाला. नाशिकमध्ये झाडे उन्मळून पडली. सोलापुरातही पावसाने दमदार हजेरी लावली. यात बार्शीत शेड कोसळले.
कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असून, तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला.

रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली
रेल्वे ट्रॅकवरच दरडी कोसळल्याने रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. प्रशासनाकडून तातडीने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मराठवाड्यात मोठा फटका
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांपासून अवकाळीचा धडाका सुरू असून, वादळी वा-यासह जोरदार पाऊस पडत असल्याने मोठे नुकसान झाले. मंगळवारी दुपारीही लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड, नांदेडच्या अनेक भागांत अवकाळीने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात चाकूर, जळकोट, शिरुर अनंतपाळ, निलंगा तालुक्यात पाऊस झाला. वीज कोसळून जळकोट तालुक्यात म्हैस, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घुगी सांगवीत आणि साकोळ येथे प्रत्येकी एका गायीचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात राजूर रोडवर आणि बदनापूर तालुक्यात लग्नाचा मंडप कोसळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR