पुणे : प्रतिनिधी
राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट आहे. राज्यात वादळी वा-यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतक-यांसमोर संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागात ४० कि.मी. ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे कोकणात मासेमारी करणा-यांच्या अडीच हजार बोटी किना-यावर आल्या आहेत.
उत्तरेकडून येणा-या वा-यामुळे देशातील हवामानात सतत बदल होत आहेत. महाराष्ट्रात दिवसा ऊन तापत आहे तर संध्याकाळी थंड वारे वाहत आहेत. दक्षिणेकडून येणा-या वा-याचा वेग वाढला आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळी वा-यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे.
हवामान विभागाने वादळी वा-यासह पावसाचा इशारा दिल्यामुळे रत्नागिरीत शेकडो मच्छिमारी बोटी किना-याला आल्या आहेत. दोन दिवस वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या वा-याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमारी बोटी बंदरात उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार मच्छिमारी बोटी आहेत.
सुरमई मासे ९०० रु. किलो
गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे. मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती परिणाम झाला आहे. मच्छीवर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. सुरमई मासे ९००रुपये किलो झाले आहेत. मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, देवगड, मालवण बंदरात मच्छिमारी बोटी किना-यालाच आहेत.
मिरची पिकाला फटका
शुक्रवारी रात्री राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे तोडणी करून ठेवलेल्या मिरचीच्या पिकाला फटका बसला आहे. रात्री २:३० वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत दीड तास रिमझिम पाऊस पडला. अनेक भागात मिरचीची तोडणी झाली असून मिरची उन्हाळ्यात खुल्या मैदानामध्ये शेतकरी ठेवतात. परंतु त्या मिरचीला अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे मिरचीचे नुकसान झाल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे.