29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात आधुनिक औद्योगिक, लॉजिस्टिक पार्क उभे राहणार

राज्यात आधुनिक औद्योगिक, लॉजिस्टिक पार्क उभे राहणार

५ हजार कोटींची गुंतवणूक, ब्लॅकस्टोन समुहासोबत सरकारचा करार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण करणा-या सामंजस्य करारावर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. राज्य सरकार तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसह पनवेल, भिवंडी, नागपूर, चाकण, खंडवा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत.

आज झालेला सामंजस्य करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे. या करारानुसार महाराष्ट्रात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी १ कोटी ८५ लाख चौरस फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल.

सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या वेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन अ‍ॅडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन अ‍ॅडव्हायझर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल आदी उपस्थित होते.

लॉजिस्टिक हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल
ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक तसेच लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. भारतातील उत्पादन, वेअर हाऊसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR