24 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ३६ अंश

राज्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ३६ अंश

मुंबई : राज्यातील तापमानात अचानक बदल झाला आहे. दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सियसपर्यंत गेला आहे. अजून दोन दिवस राज्यात वाढलेले तापमान कायम असणार आहे. पुणे येथील हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांना अचानक वाढलेल्या तापमानवाढीचे कारण दिले आहे.

हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन दिवस ३४ ते ३५अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. तापमानातील ही वाढ उत्तर भारतामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे झाली आहे. अजून दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी
राज्यात सध्या दिवसा कडक ऊन जाणवत आहे. तसेच रात्रीच्या वेळी थंडी वाढत आहे. त्यामुळे विचित्र वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर तापमानात वाढ होत असते. परंतु यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील झालेल्या हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारण दोन-तीन दिवस असणार आहे. गेल्या २४ तासांत सोलापूरसोबत, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागातील तापमान ३६ अंशांवर गेले.

पुण्यात तापमान वाढले
पुणे शहरातील कोरेगाव पार्कमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदवण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ५ पर्यंत पुण्यात कडक ऊन होते. त्यावेळी कोरेगाव पार्क येथे ३८.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. यामुळे पुणेकरांना चांगलाच उन्हाचा चटका जाणवत होता. तापमानवाढीमुळे ठिकठिकाणी रुमाल, टोप्यांची दुकाने दिसू लागली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR