मुंबई : प्रतिनिधी
जगात सर्वत्र एप्रिल फूल केवळ एकाच दिवशी साजरा होतो. महाराष्ट्र मात्र गेल्या तीन महिन्यांपासून याचा अनुभव घेतो आहे. पुढील निवडणूक येईपर्यंत महाराष्ट्रात ‘एप्रिल फूल उत्सव’ सुरूच राहणार आहे, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज एक एप्रिलच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारला टोला लगावला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील जनतेला सरकारकडून एप्रिल फूल बनवण्यात येत असल्याचा अनुभव आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्याकडून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्वच घटकातील लोकांनी अक्षरश: आश्वासनांचा पाऊस पाडला होता. लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतक-यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांच्या हाताला रोजगार वगैरे. या आश्वासनांमुळे मतदारांनी महायुतीवर मतांचा पाऊस पाडला. २३२ आमदारांसह बहुमताची सत्ता दिली. पण निवडणुका झाल्या आणि सत्ताधा-यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला.
नुकतेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण यात ना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा शब्द होता, ना शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी तरतूद. उलट जे नेते निवडणुकीआधी जाहीर सभांमधून ही आश्वासनं देत होते तेच आता हे शक्य नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे सांगत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यात आघाडीवर आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र सूर काहीसा वेगळा आहे.
मात्र त्यांची दखल सध्या फडणवीस, अजित पवार यांच्याकडून फारशी घेतली जात नसल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एप्रिल फूल निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्राचा आधार घेत सरकारवर खरमरीत टीका केली आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत दानवे यांनी सरकारला टोला लगावताना महाराष्ट्रात पुढील निवडणूक येईपर्यंत एप्रिल फूल उत्सव सुरूच राहील असे म्हटले आहे.
जगात सर्वत्र एप्रिल फूल केवळ एकाच दिवशी साजरा होतो. महाराष्ट्र मात्र गेल्या तीन महिन्यांपासून याचा अनुभव घेतो आहे. पुढील निवडणूक येईपर्यंत महाराष्ट्रात ‘एप्रिल फूल उत्सव’ सुरूच राहणार आहे, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारला डिवचले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या यासारख्या विषयावरून तुटून पडणा-या अंबादास दानवे यांनी एप्रिल फूलच्या दिवशी केलेल्या या टीकेची चांगलीच चर्चा होत आहे.