पुणे : प्रतिनिधी
राज्यात परीक्षेतील पेपर फुटण्याच्या प्रकारांना आळा घालण्यात सरकारला यश आलेले दिसत नाही. हे प्रकार अविरत सुरूच आहेत. राज्यात सुरू असलेल्या एमबीबीएसच्या परीक्षांमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमबीबीएस परीक्षांचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षांमध्ये चारही पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेपर वेळेवर बदलण्याची नामुष्की आरोग्य विद्यापीठावर आली आहे.
पेपर फुटल्याच्या प्रकारामुळे आरोग्य विद्यापीठाने काही ठिकाणी पुनर्परीक्षा घेतली आहे. फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन्ही प्रश्नपत्रिकांच्या दोन्ही भागांमध्ये हा प्रकार घडल्याने परीक्षा वेळेवर सुरू झाली नाही. गैरप्रकारांमुळे या परीक्षा अर्धा ते पाऊण तास उशिरा सुरू होत असल्याची तक्रार परीक्षार्थी करत आहेत.
या सर्वांत विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप होतोय. या घडलेल्या घटनांच्या बाबतीत म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या आणि गुन्हे शाखेत आरोग्य विद्यापीठाने तक्रार दाखल केली आहे.
सोमवारी पॅथॉलॉजी दोनचा पेपरही लीक झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे तो पेपरही वेळेवर बदलण्यात आला. गेल्या आठवड्यात बुधवारी म्हणजेच ४ डिसेंबरला पॅथॉलॉजी विषयाची प्रश्नपत्रिका लीक झाल्याने वेळेवर दुसरी प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि परीक्षा पार पडली. यामुळे परीक्षार्थींना अर्धा ते पाऊण तास प्रश्नपत्रिका उशिरा मिळत आहे.
गेल्या सोमवारी म्हणजेच २ डिसेंबरला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या फार्माकोलॉजी या विषयाचा पेपरही लीक झाला होता. ती परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे नंतर जाहीर करण्यात आले होते.