मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे काही भागांमधील तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र काही भागातील तापमानाचा पारा खाली घसरलेला आहे. त्यामुळे कुठे उकाडा तर कुठे गारवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्याच्या तापमानात सध्या कमालीचे बदल पहावयास मिळत आहेत. सकाळी गारवा तर दुपारी प्रचंड उकाडा जाणवत आहे. काही भागातील तापमानाचा पारा खाली घसरलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहराचा समावेश आहे. मुंबईत दिवसा जरी उन्हाचे चटके बसत असले तरी रात्री आणि सकाळी मात्र थंडी पडत आहे. यामुळे येत्या काही दिवसांचे तापमानही असेच बदलते राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर आले असताना राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये कुलाबा येथे २२.६ तर सांताक्रूझ येथे २०.१अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.६ आणि २.४ अंशांनी अधिक होते. दिवसभरात वातावरणात कुलाबा येथे आर्द्रता अधिक होती तर सांताक्रूझ येथे मात्र ४० टक्क्यांहून कमी होती. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअस नोंदला गेला. कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअस अधिक होते.
मुंबईतील तापमानात घट झालेली असली तरी शेजारील जिल्हा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली आहे. ज्यामुळे पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यातील तापमानाचा पारा हा ३४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे कुठे गारवा तर कुठे उष्णता असे सध्याचे महाराष्ट्रातील तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे.
वा-याच्या दिशेत सतत बदल
वा-यांची दिशा गेल्या दोन आठवड्यांपासून सतत बदलत आहे. वा-यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर टिकून असल्यामुळे उत्तरेकडील थंड वा-यांना अटकाव होत आहे. वातावरणाला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. जसे की, महाराष्ट्रावर हवेचा उच्च दाब तसेच प्रत्यावर्ती चक्रीय वा-यामुळे उत्तरेकडील थंड वारे अडवले जात आहेत.