पुणे : प्रतिनिधी
राज्यात काही ठिकाणी दिवसा कडाक्याचे ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने बुधवारी, गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतक-यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शाळू काढणीला आला असून, अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरुवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. नंतर तो ‘यलो अलर्ट’ असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ४ आणि ५ तारखेला पूर्वेकडे स्थलांतरित होऊन विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी विजा, ढगांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. यावेळी अनेक ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज आहे.
अवकाळीसाठी पोषक हवामान
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे. तर पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, अमरावती आणि बीड या १० जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही जाणवत आहे. वातावरणातील बदलाचा फरक सध्या जाणवत आहे.
हवेत चक्रीय स्थिती
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रात हवेत चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे वातावरणातील खालचा जो भाग आहे, तिकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे असतात. वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे असतात. अशी परिस्थिती ढगाळ वातावरणासाठी तथा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्यासाठी पूरक असते, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता
येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार केला तर या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.