मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थोडा ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. विशेषत: पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये दुपारी उकाडा अस होत आहे.
दरम्यान, मागच्या आठवड्यात पुण्यात कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअस, तर मुंबईत ३४.६अंश सेल्सिअस इतकं दिसून आलं. मुंबईसह उपनगरांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण असले तरी उन्हाचे चटके कायम आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासांत तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
देशाच्या उत्तर भागात मात्र हवामानाची स्थिती पूर्णत: वेगळी आहे. इराणमार्गे येणा-या नव्या पश्चिमी झंझावात मुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.