मुंबई : प्रतिनिधी
कोरोना गेल्याचं मानलं जात असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईत या संसर्गाचा धोका डोकं वर काढू लागलाय. केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या चाचणीत कोरोना विषाणूची उपस्थिती आढळली आहे. यामुळे मुंबईत कोरोनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मृत्यांमुळे संपूर्ण शहरात चिंता पसरली असून, नागरिक पुन्हा एकदा मास्क लावायची वेळ आली का? या विचारात आहेत. एक ५८ वर्षांची महिला आणि एक १३ वर्षांची मुलगी केईएममध्ये दाखल होत्या. चाचणीनंतर दोघींनाही कोविड पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले, मात्र हॉस्पिटल प्रशासनाने हे मृत्यू त्यांच्या जुन्या गंभीर आजारांमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.\
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटल्याने केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये या घटनेमुळे नव्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. विशेष म्हणजे, सिंगापूरमध्ये रुग्णसंख्या अवघ्या एका आठवड्यात २८ टक्क्यांनी वाढली आहे. भारतातही काही प्रमाणात वाढ नोंदवली गेली असून, सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ९० च्या घरात आहे.
डॉक्टरांचे आवाहन
आरोग्य तज्ज्ञांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आणि आवश्यक असल्यास त्वरित चाचणी करून उपचार घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखणे या खबरदारीच्या उपायांची पुन्हा अंमलबजावणी होण्याची गरज आहे.