माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची टीका
लातूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुतीचे सरकार जनमताने सत्तेवर आलेले नाही, अशी जनतेची भावना झाली आहे. यामुळे ईव्हीएमबाबत सर्व स्तरातून आणि वेगवेगळया मतदान केंद्रावर शंका व्यक्त होत आहेत, या शंकाचे निरसन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील नागरिकांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने तेथे बळाचा वापर करून ग्रामस्थांचा प्रयत्न हाणून पाडला. या सर्व शंकाचे निरसन निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे. परंतु सरकार दडपशाही करीत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे, असे पत्रकारांशी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबई येथे सुरु असून शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी विधीमंडळ प्रागंणात ते पत्रकाराशी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नागरिकाकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातून सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आले. यानंतर सर्वत्र या प्रकरणावर चर्चा होऊ लागली. काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीदेखील या गावात येणार असून येथूनच ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरु करणार आहेत. विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल भूमिका मांडण्यात आली आहे. विद्यमान महायुतीचे सरकार एवढ्या मतांनी निवडून आले. पण मतदारांत आनंद नाही, मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेले बहुमत आहे की ईव्हीएम-निवडणूक आयोगाने दिलेले बहुमत आहे. तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला. तो होऊ दिला नाही. उलट त्याच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे महाविकास आघाडी म्हणून शपथविधीला विरोध नाही, पण जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेणार नाही, अशी भूमिका घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.