मुंबई : प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील ‘शिवशाही’ बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न चर्चेत आलेला असतानाच जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नसेल तर इतरांचे काय असा सवाल या प्रकरणानंतर उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबरच इतर मुलींची टवळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार समजल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या स्वत: मुली आणि महिलांना घेऊन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. त्यांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव गोळा झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचे काय? असा सवाल रक्षा खडसेंनी पोलिसांना विचारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, राज्यभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. आरोपींमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. अनेकदा मुली पुढे येत नाहीत. मात्र आपणच पुढे आले पाहिजे. म्हणूनच ती तक्रार करण्यासाठी गेली आहे. आपल्या मुलीचे नाव येऊ नये असे पालकांना वाटते. अखेर नाइलाज झाल्याने त्यांना आज तक्रार करण्यासाठी जावे लागले, असे एकनाथ खडसेंनी सांगितले. पोलिसांना मारहाण करण्यात आली
घटना दोन दिवसांपूर्वी घडली. डीएसपीबरोबर मी स्वत: बोललो, एआयजींबरोबर बोललो. रश्मी शुक्लांशी बोललो. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर दोन तास बसवले गेले. मुलींचा विषय आहे विचार करा असे सांगण्यात आले. त्याने पोलिसांना मारहाण केली. तो पोलिसांना मारहाण करेपर्यंत प्रकरण गेले. त्याला जामीन मिळाला. या लोकांना राजकीय संरक्षण असल्याने त्यांना काहीच होत नाही. घटना घडल्यानंतर चर्चा होतात. पण घटना होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.
मुंबईत नराधम बापानेच केली मुलीची हत्या
मुंबईमधील घाटकोपर येथे मुलगी नको म्हणून बापाने पाळण्यातच चार महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये ही विचित्र आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे असे आपल्याच चार महिन्यांच्या बाळाचा जीव घेणा-या नराधम बापाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
बापाकडून १४ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या १४ वर्षीय मुलीवर नराधम बाप ८ महिने लैंगिक अत्याचार करत होता. मुलीची आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.