30.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात युवा संघर्ष निर्धार परिषदेचे आयोजन

राज्यात युवा संघर्ष निर्धार परिषदेचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी
राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे. येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. त्यात सत्ताधा-यांविरोधात ही आघाडी रणशिंग फुंकणार आहे. त्याची चुणूक त्या आघाडीच्या टॅगलाईनमधून दिसून आली. या परिषदेत सत्ताधा-यांना तिन्ही नेते घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला. तिन्ही पक्षांना मिळूनही ५० आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’चे आयोजन केले आहे.

सध्या महाविकास आघाडी विरोधात आहे. शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत. परंतु या तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठे संख्याबळ मिळवता आले नाही. त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे. आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणार आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधा-यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे.

सत्ताधा-यांसमोर आव्हान
‘खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.!’ या टॅगलाईनखाली ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आघाडी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करणार का? हे येत्या काळातच दिसून येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR