नागपूर : प्रतिनिधी
गोंदिया वनखात्याअंतर्गत कोहका-भानपूर मार्गावर वाघाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही माहिती मिळताच वनखात्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेरचे हे क्षेत्र आहे. ज्याठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, तो वाघांचा कॉरिडॉर आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, वनखात्याचे पथक व स्वयंसेवी घटनास्थळी पोहोचले असून ते वाघाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, १४ दिवसांतील हा सहाव्या वाघाचा मृत्यू आहे.
राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना अवघ्या १४ दिवसांत सहा वाघ मृत्युमुखी पडले. २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये राज्यात वाघांच्या मृत्यूचा आलेख ५० टक्क्यांनी खाली होता. मात्र, आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अभयारण्य किंवा व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर हे मृत्यू झाले आहेत. यातील काही मृत्यू संशयास्पद आहेत. यवतमाळच्या प्रकरणात वाघाचे दात आणि नखे गायब आहेत. तर भंडा-याच्या प्रकरणात चक्क वाघाचे तुकडे सापडले. दरम्यान, या पाच वाघांपैकी दोन मृत्यू हे अवघ्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्यांचे आहेत.