29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमे-यांची सक्ती!

राज्यात शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमे-यांची सक्ती!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपायोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील बदलापूर घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व शाळांना शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच शाळेतील कर्मचा-यांची नियमित चारित्र्य तपासणी व्हावी, असेही म्हटले आहे.

खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील. किमान एक महिन्याचे फुटेज बॅकअप असलेले सीसीटीव्ही कॅमेरे वर्गखोल्यांचे प्रवेशद्वार, कॉरिडॉर, मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे गेट, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहांच्या बाहेर, इ. ठिकाणी बसविण्यात यावेत. या तरतुदीचे पालन न करणा-या शाळांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याची (नियमित/बा स्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने) नियुक्ती करताना त्यांची पार्श्वभूमी, पूर्वीची सेवा, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याची पडताळणी करून नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल पोलिस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेकडे देण्यात यावी. कर्मचा-यांच्या चारित्र्य पडताळणीकरिता क्राइम अ‍ॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम्ससारख्या तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचा वापर करण्यात यावा. नेमणुकीनंतर एखाद्या कर्मचा-याची पार्श्वभूमी फौजदारी गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निदर्शनास आल्यास त्यास तात्काळ सेवेतून कमी करण्यात यावे, असे म्हटले आहे.

चारित्र्य पडताळणी
करून प्रमाणपत्र घ्या
शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृहव्यवस्थापन तसेच उपहारगृह यासाठी नेमण्यात येणारा कर्मचारी वर्ग मान्यताप्राप्त संस्थेकडून नेमण्यात यावा. सदर कर्मचा-यांची पोलिस यंत्रणेकडून चारित्र्य पडताळणी करून प्रमाणपत्र घेण्यात यावे.

स्वतंत्र स्वच्छतागृहे हवीत
प्रत्येक शाळेत मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत. मुलींसाठी स्वच्छतागृहाजवळ एक महिला परिचर तैनात केली जावी. त्याचप्रमाणे मुलांसाठी स्वच्छतागृहाजवळ एक परिचर तैनात केला जावा. स्वच्छतागृहांची स्वच्छता राखली जावी. सर्व स्वच्छतागृहांमध्ये पाणी आणि लाईटची उपलब्धता असावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

टोल फ्री नंबर प्रदर्शित करा
टोल फ्री चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ (किंवा बदललेला नवीन क्रमांक) एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जावा, जिथे मुले तो नोंदवू शकतील. या क्रमांकावर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल, याची माहिती मुलांना देण्यात यावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR