मुंबई : प्रतिनिधी
राज्यात जवळपास १८ हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांचा पट २० पेक्षा कमी आहे. त्यामुळे आता लवकरच १८,६०८ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने राज्यात कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे. आता दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळेत १ शिक्षक तर २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत १ नियमित आणि १ कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे. या आकडेवारीनुसार राज्यात १८ हजार १०६ शाळांवर आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यात येणार आहेत.
संचमान्यतेच्या निर्णयानुसार माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे आता शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या समायोजनासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील ६४० शाळांमधील तीन हजार शिक्षकांना समायोजित करावे लागणार आहे.
पाचवी ते आठवीसाठीही कंत्राटी भरती
खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जर नववी आणि दहावीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्या शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन केले जाणार आहे. परंतु पाचवी ते आठवीच्या वर्गातील शिक्षकांचे काय होणार याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. परंतु त्या वर्गांवरील नियमित शिक्षक अतिरिक्त होतील. कंत्राटी शिक्षकच घ्यावे लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

