लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शासकीय वसाहतीतील सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. महिला व बाल विकास विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या या केंद्राच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव, जिल्हा संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक स्वाती डोके, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे धम्मानंद कांबळे, परिवीक्षा अधिकारी गजानन सेलूकर आणि धनंजय जवळगे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि कौटुंबिक छळाला बळी पडलेल्या महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि गरजेनुसार आश्रयाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आले आहे. अत्याचारग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी हे सेंटर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे चाकणकर यांनी यावेळी नमूद केले.
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात समुपदेशनाद्वारे कुटुंब एकत्र आणण्याचे आणि महिलांना न्याय देण्याचे काम या सेंटरद्वारे होत असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायदा (पॉश कायदा) तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत लवकरच प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
चाकणकर यांनी यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, सखी वन स्टॉप सेंटरची पाहणी करून त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी केंद्रामार्फत केल्या जाणा-या कामकाजाची माहिती दिली.